बार्शी – घरात किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर घरातून निघून गेलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना बार्शी शहरातील सोलापूर रोडवरील बगले बरड परिसरात घडली. स्वप्निल राजू कुचेकर (वय २७) असे बेपत्ता तरुणाचे नाव असून, त्याची आई रमाबाई राजू कुचेकर (वय ४७) यांनी गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी बार्शी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वप्निल कुचेकर याचे जून २०२६ मध्ये लग्न झाले असून तो पत्नी सुप्रिया आणि आई रमाबाई यांच्यासोबत राहत होता. २४ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वप्निल दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याचा पत्नीशी किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादानंतर तो घरातून निघून गेला
स्वप्निल घरी परत न आल्याने त्याची आई आणि पत्नीने त्याचे मित्र व नातेवाइकांकडे चौकशी केली. तसेच विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र तो मिळून आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी आई रमाबाई कुचेकर यांनी पोलिसांत धाव घेतली.
बेपत्ता तरुणाचे वर्णन : स्वप्निल राजू कुचेकर, वय २७ वर्षे, रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, डोळे काळे. घरातून निघताना त्याने निळ्या रंगाचे जर्किन आणि काळ्या रंगाची जिन्स परिधान केली होती. त्याला मराठी भाषा बोलता येते.
स्वप्निलचा शोध घेऊन तो मिळून यावा, अशी विनंती त्याच्या आईने पोलीसांकडे केली आहे. फिर्यादीत अज्ञात व्यक्तीने त्याला पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत
Post Views: 11