सोलापूर – श्रावण मासनिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि कुंभारी येथील अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजच्यावतीने आयोजित शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी 45 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शुक्रवारी, श्री सिद्धेश्वर मंदिराच्या आवारात सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मंदिरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी आलेले भाविक, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक यांनी शिबिरामध्ये सहभागी घेऊन रक्तदान केले.
प्रारंभी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन देवस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र घुली यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विश्वस्त रतन रिक्के, विश्वनाथ लब्बा तसेच डॉ. सुरेखा काडादी, पोर्णिमा शिवपुजे, श्री सिद्धेश्वर फिजीओथेरपी कॉलेजचे प्राचार्य टी. सुरेशकुमार आदी उपस्थित होते. दुपारी तीन वाजेपर्यंत 45 जणांनी रक्तदान केले.
अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज ब्लड बँक आणि हेडगेवार ब्लड बँकेने रक्त संकलित केले. श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी शिबिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विश्वस्त गुरुराज माळगे तसेच अरुण लातूरे आदी उपस्थित होते.




















