बार्शी – तालुक्यातील लक्ष्याचीवाडी शिवारात बार्शी-परंडा मार्गावर वाहतूक नियमन करताना एका संतप्त दुचाकीस्वाराने पोलीस कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करुन जखमी केले. शासकीय कामात अडथळा आणण्याचा हा प्रकार शनिवारी सकाळी ११.४५ वाजता घडला. जखमी पोलीस हवालदार जयंत शिंदे (वय ३७) यांच्यावर बार्शीतील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेचा तपास तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार बोबडे करत आहेत.
पोलीस हवालदार जयंत शिंदे यांच्या फिर्यादीनुसार, ते आणि त्यांचे सहकारी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत वाहतूक तपासणीच्या ड्युटीवर होते. बार्शीकडून परंड्याकडे जाणाऱ्या एका बुलेट मोटारसायकलस्वाराला हाताच्या इशाऱ्याने थांबण्यास सांगितले. गाडी थांबताच, आरोपी शंकर चांगदेव वाघ (रा. उपळाई ठोंगे, ता. बार्शी) याने संतापात प्रश्न विचारत सुरु केले, “पोलिसांना गाडी अडवण्याचा अधिकार कोणी दिला? तू कोण मला गाडी अडविणार? तू मला ही बुलेट दिली आहेस का?” यानंतर त्याने अपशब्दांचा भडिमार सुरु केला.
शिंदे आणि सहकारी पोलीस स्टाफने आरोपीला शांत राहण्यास, त्याची अडचण काय आहे ते सांगण्यास सांगितले. मात्र, वाघने पुन्हा शिवीगाळ केली आणि मोटारसायकलवरुन उतरुन जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने शिंदे यांच्या डोक्यात जोरदार मारली. मारहाणीनंतर त्याने शिंदे यांना गच्चीला धरुन ढकलले आणि “तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुम्हाला बघून घेतो,” अशी धमकी देत घटनास्थळावरुन पळून गेला.
या घटनेमुळे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात खळबळ उडाली असून, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, अश्लील भाषा आणि इतर कलमांखाली वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असून, लवकरच त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या प्रकाराने वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी अशा हिंसक वर्तनाला कठोरपणे आळा घालण्याचा इशारा दिला आहे.
















