सोलापूर : शिवभक्तांची लगबग, मिणमिणत्या शेकडो पणत्या अन छत्रपती श्री शिवरायांचा जयघोष अशा वातावरणात बुधवारी दीपोत्सव झाला. निमित्त होते कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागातर्फे आयोजितलेल्या दीपोत्सवाचे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी तिरुमलाई येथील शिव मंदिराचा कार्तिक पौर्णिमेला जीर्णोद्धार केला. तसेच दीपोत्सवही केला. त्या स्मृतीनिमित्त श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे दरवर्षीप्रमाणे बुधवारी रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात हा दीपोत्सव करण्यात आला. यावेळी संपूर्ण उद्यानात विविध ठिकाणी शेकडो पणत्या शिवभक्तांनी प्रज्वलित केल्या.
प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या परिसरात शेकडो पणत्या प्रज्वलित करून अत्यंत उत्साहात दीपोत्सव साजरा झाला. एकाचवेळी शेकडो पणत्या प्रज्वलित केल्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती आणि परिसर या दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाला.
यावेळी कार्यक्रमाच्यास्थळी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूर विभागाचे धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















