सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने सोलापूर महापालिकेला आज बुधवार दि. 28 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली. तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे, तसे कार्यालयीन परिपत्रक महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी काढले आहे. दरम्यान, महापालिकेतील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दि. 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात निधन झाले आहे. उक्त संदर्भीय संदेशानुसार महाराष्ट्र राज्यात दि. 28 ते 30 जानेवारी 2026 या तीन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार असल्याने सर्व राज्य शासकीय कार्यालयातील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर करण्याच्या व दि. 28 जानेवारी 2026 रोजी सर्व राज्य शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.
प्राप्त सुचनेनुसार दि. 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत सोलापूर महानगरपालिकेतील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकविण्यात यावे. या कालावधीत कोणतेही अधिकृत मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत. तसेच दि. 28 जानेवारी 2026 रोजी सर्व विभाग/कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी कार्यालयीन परिपत्रकात म्हटले आहे.

















