नांदेड – कुवेत येथे वास्तव्यास असलेल्या एका भारतीय नागरिकाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असून, या प्रकरणी सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिहारपूर येथील रहिवासी शेख जुबेर महम्मदसब शेख (वय अंदाजे 30) यांचा 4 फेब्रुवारी 2026 रोजी कुवेतमध्ये मृत्यू झाला.
मृत शेख जुबेर हे भारतीय पासपोर्ट क्रमांक P3427699 चे धारक होते. कुटुंबीयांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद परिस्थितीत झाल्याचे संकेत मिळत आहेत. घटनेभोवती अनेक विसंगती आढळून येत असल्याने, हा मृत्यू अपघाती नसून घातपाताचा असण्याची शक्यता कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर मृताचे वडील मोहम्मदसब शेख यांनी भारतीय दूतावास, कुवेत यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. संबंधित निवेदनात कुवेतमधील स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत –
मृत्यूच्या कारणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी
आवश्यक असल्यास फॉरेन्सिक तपासणी व शवविच्छेदन
वैद्यकीय अहवाल, पोलीस नोंदी व अधिकृत कागदपत्रांची उपलब्धता
कायदेशीर प्रक्रियेसाठी कुटुंबीयांना आवश्यक ती मदत
शेख जुबेर यांच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे मोठा मानसिक आघात झाला असून, त्यांना न्याय आणि सत्य समोर यावे, यासाठी भारतीय दूतावासाने हा विषय उच्च प्राधान्याने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सुरू होणार का, तसेच भारतीय दूतावासाकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे नांदेड जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.


















