सोलापूर : गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जुन्या विडी घरकुल परिसरातील चंदेले शैक्षणिक संकुलात गुरुवारी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. बालाजी अमाइन्सच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत वाडिया हॉस्पिटल आणि उद्योगवर्धिनी यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
भाई छन्नुसिंह चंदेले समाजकार्य महाविद्यालय, राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा आणि देशभक्त भाई छन्नुसिंह चंदेले माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. अभिजित जिरगे यांनी एचपीव्ही लसीकरणाची माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हेमूजी चंदेले ,अनिल विपत, प्रसाद सांजेकर, अमोल गुंड, प्राचार्य एस. बी. गायकवाड, महादेव तोळणुरे, राहुल चंदेले, अमृतदत्त चिन्नी आदी उपस्थित होते.
ह्युमन पॅपिलोमाव्हायरस या विषाणूमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आणि इतर आजारांचा धोका संभवतो. लसीकरणामुळे या संसर्गापासून संरक्षण मिळण्यास मदत होते. नऊ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी हे लसीकरण महत्त्वाचे असून, पालकांची संमती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बालाजी अमाइन्सच्या वतीने वाडिया हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत उपलब्ध करून दिली जाते.
संस्थेचे अध्यक्ष हेमूजी चंदेले यांनी पालकांनी लसीकरणाबाबत जागरूक राहून मुलींच्या आरोग्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.चंदाराणी गुंड यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10