सोलापूर : शहरातील पाणी टाकी, शांती चौकनजीकच्या महापालिकेच्या हिंदू स्मशानभूमीची अवस्था अतिशय दयनीय झाली असून नागरिकांच्यादृष्टीने ती वेदनादायी आहे. नूतन महापौर विनायक कोंड्याल यांनी या गंभीर बाबीची त्वरित दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी नागरिक या नात्याने केली आहे.
यासंदर्भात त्यांनी महापौरांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, या हिंदू स्मशानभूमीची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय, अस्वच्छ व नागरिकांसाठी वेदनादायक आहे.या स्मशानभूमीमध्ये पुढील विविध गंभीर त्रुटी आढळून येत आहेत. स्मशानभूमीचा योग्य व स्पष्ट नावफलक उपलब्ध नाही. संरक्षक भिंत व प्रवेशद्वार नसल्याने परिसर उघडा व असुरक्षित आहे.सर्वत्र कचरा, घाणीचे ढिगारे, दुर्गंधी व अस्वच्छता आहे. अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ व सन्मानजनक प्रवेशमार्ग उपलब्ध नाही.
अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या कुटुंबीयांना या परिस्थितीमुळे मानसिक त्रास सहन करावा लागत असून, ही बाब आपल्या संस्कृती, श्रद्धा व मानवी संवेदनांशी संबंधित आहे. स्मशानभूमी ही केवळ एक जागा नसून, ती समाजाच्या सन्मानाची व संस्कारांची प्रतीक आहे.
वरील विविध त्रुटी लक्षात घेता महापालिकेने या स्मशानभूमीत तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, संरक्षक भिंत व प्रवेशद्वार (गेट) उभारावे, योग्य नावफलक लावावे, अंत्यसंस्कारासाठी आवश्यक मूलभूत सुविधा व सुरक्षित प्रवेशमार्ग उपलब्ध करून द्यावा. याबाबत महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित आदेश द्यावेत, असे डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
उपाययोजना राबवण्याची महापौरांची ग्वाही
डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी निवेदन पाठविल्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांनी त्याची सकारात्मक दखल घेतली. या संदर्भात त्यांनी या स्मशानभूमीमध्ये आवश्यक उपाययोजना राबवण्याची ग्वाही डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांना दिली. महापौरांनी या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
















