पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील भौतिकशास्त्र, गणित, संख्याशास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स विभाग तसेच IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम उत्साहात संपन्न झाला. “एम्पॉवरिंग एज्युकेटर्स विथ ए. आय. टूल्स फॉर रिसर्च” या विषयावर आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश प्राध्यापकांना कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा संशोधन प्रक्रियेत प्रभावी वापर करण्यासाठी सक्षम करणे हा होता. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. योगेश पाठक होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. अमर कांबळे, डॉ. समाधान माने व डॉ. बी. एस. बळवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उद्घाटनपर भाषणात प्राचार्यांनी संशोधनात ए. आय. साधनांची वाढती उपयुक्तता अधोरेखित केली.
कार्यक्रमात विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रा. धनंजय क्षीरसागर यांनी ‘फंडामेंटल्स ऑफ ए. आय.’ या विषयावर मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या. प्रा. समाधान गायकवाड यांनी ए. आय. टूल्सच्या साहाय्याने ‘रिसर्च गॅप’ ओळखण्याचे तंत्र सांगितले. प्रा. डॉ. सुमय्या पठाण यांनी ‘स्मार्ट लिटरेचर सर्वे’ संदर्भात मार्गदर्शन केले, तर प्रा. डॉ. संजय चव्हाण यांनी सिमेंटिक व गुगल नोटबुक एलएमच्या सहाय्याने साहित्य सर्वेक्षण कसे करावे हे प्रत्यक्ष दाखवून दिले.
प्रा. विजय राऊत यांनी संशोधन लेखनासाठी लॅटेक्सचा उपयोग स्पष्ट केला. प्रा. अवि कोपार्डे यांनी सर्वेक्षण निर्मितीसाठी स्मार्ट ए. आय. टूल्सची माहिती दिली. प्रा. डॉ. शरदकुमार निंबाळे यांनी गुणात्मक व परिमाणात्मक डेटा विश्लेषणासाठी ए. आय. साधनांचा वापर कसा करावा यावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. अपर्णा माने यांनी रेफरन्स मॅनेजमेंटमधील ए. आय. टूल्सचे महत्त्व सांगितले. प्रा. पांडुरंग घाडगे यांनी संशोधनातील नीतिमत्ता व प्लॅजिअरिझम याविषयी मार्गदर्शन करून जबाबदार संशोधनाची गरज अधोरेखित केली.
समारोप समारंभास डॉ. राजेश कवडे, डॉ. अनिल चोपडे, डॉ. समाधान माने व प्रा. योगेश पाठक उपस्थित होते. प्रातिनिधिक मनोगतात प्रा. भाग्यश्री नाईकनवरे व डॉ. दत्तात्रय डांगे यांनी कार्यक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा संशोधन कार्यात निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे आभार प्रा. दादासाहेब आरेकर यांनी मानले.
सदर कार्यक्रमामुळे प्राध्यापकांना संशोधनातील नव्या तंत्रज्ञानाची ओळख होऊन संशोधनाची गुणवत्ता उंचावण्यास निश्चितच चालना मिळणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.






















