सोलापूर : केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरुद्ध आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर संघ (BMS), सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘सरकार जगावो’ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो कामगार आणि पदाधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये नवीन कामगार कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी कोणतीही ठोस आर्थिक तरतूद नसल्याबद्दल आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रामुख्याने EPS-95 अंतर्गत निवृत्त कर्मचाऱ्यांना किमान ५,००० रुपये व त्यापेक्षा जास्त पेन्शन वाढ मिळावी, ही मागणी लावून धरण्यात आली. भारतीय मजदूर संघ हा देशातील सर्वात मोठ्या कामगार संघटनांपैकी एक असून, कामगारांच्या हितासाठी हे देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नंदकुमार भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाचे वाचन केले. त्यांनी केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणांवर सडकून टीका केली. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुधांशू रानडे यांनी ओरिसा, पुरी येथील अखिल भारतीय अधिवेशनात संमत झालेल्या ठरावांची माहिती दिली.
“जर शासनाने या मागण्यांकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आगामी काळात यापेक्षाही तीव्र आणि उग्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा नंदकुमार भोसले यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
























