पंढरपूर – शहर आणि तालुक्यात पारंपारिक संस्कृती जपत रंगपंचमीचा सण रविवारी (ता.८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या काही वर्षा पासून शहरात पाण्याचा वापर न करता कोरड्या रंगांची उधळण करीत रंगपंचमी उत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे या वर्षी देखील कोरड्या रंगाची उधळण करीत अगदी लहानग्यां पासून ते ज्येष्ठां पर्यंत सर्वजण रंगोत्सवात सहभागी झालेले दिसत होते.
रंग पंचमी निमित्त शहरात सकाळ पासून बच्चे कंपनीने रंग खेळण्यास सुरुवात केलेली दिसत होती. शहरातील बहुसंख्य दुकानदार मंडळींनी अनायसा रविवार असल्याने आणि त्यामध्येच आज रंगपंचमीचा सण आल्यामुळे रंगपंचमी निमित्त् दुकानांना खास सुटी घेवून रंगोत्सवा सारख्या पारंपारिक उत्सवा मध्ये सहभागी झालेले दिसत होते.
शहरातील प्रदक्षिणा मार्ग, नवीपेठ, जुनीपेठ, संतपेठ, भादुले चौक, महावीर नगर तसेच उपनगरातील गजानन नगर, मनिषा नगर, लिंकरोड, टाकळी परिसर,शाकुंतल नगर, इसबावी आदी ठिकाणी तरुण, तरुणींचे जथ्थे कोरड्या रंगाची उधळण करीत ये जा करीत होते. शहर तसेच उपनगरातून अनेक ठिकाणी हौशी तरुणांनी लाऊडस्पीकर लावून त्याच्या तालावर ठेका धरित अगदी उत्साही वातावरणा मध्ये रंगपंचमी साजरी केली. या वेळी अनेक तरुणांचे जथ्थे दुचाकी वरुन मित्रमैत्रिणांना रंग लावण्यासाठी ये जा करताना दिसत होते. शहरा प्रमाणेच तालुक्यातील विविध गावांमधून रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. दरम्यान रंगपंचमी उत्सवाच्या वेळी शहर व तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार होवू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केल्याचे दिसत होते.
———————–
चौकट : ( यमाई तलावर रंगोत्सव साजरा )
येथील यमाई तलाव परिसरात दररोज सकाळी, संध्याकाळी फिरावयास येणाऱ्या काही हौशी मंडळींनी स्थापन केलेल्या सुप्रभात मंडळाच्या वतीने रंगपंचमी साजरी करण्यात आली. येथील तुळशीवृंदावनाच्या समोरील बाजुस असलेल्या मोकळ्या पटांगणात रंगोत्सवास सुरुवात करण्यात आली. या रंगोत्सवात शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांसह महिला, मुली तसेच बच्चे कंपनी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होवून रंगोत्सवाचा आनंद घेत असताना दिसत होती. या वेळी तरुणाई अक्षरश: डीजेच्या तालावर थिरकलेली होती.
————————–
फोटोओळी : पंढरपूर : येथील यमाई तलाव परिसरात आयोजिण्यात आलेल्या रंगउत्सवात अवघी तरुणाई अक्षरश: विविध रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत होते.





















