सांगोला – राजुरी, अनकढाळ, पाचेगाव, जुनोनी आणि कोळा परिसरात बुधवार दि.१८ मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह भीषण गारपिटीमुळे शेतीचे व प्रामुख्याने फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या नैसर्गिक आपत्तीची गांभीर्याने दखल घेत आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी गुरुवार दि.१९ मार्च रोजी कृषी अधिकारी दिपाली जाधव आणि तहसीलदार बाळुताई भागवत यांच्यासह राजुरी परिसरातील द्राक्ष व डाळिंब बागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी घटनास्थळावरूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानीची भीषणता सांगून तात्काळ मदतीची मागणी केली.
शासनाकडून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून, आगामी विधानसभेच्या अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले. याप्रसंगी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पडलेल्या गारांचा आकार मोठा असल्याने द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. या भागात डाळिंब आणि द्राक्ष लागवड मोठ्या प्रमाणात आहे. प्राथमिक अंदाजानुसार या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून डाळिंबासोबतच मका पिकालाही मोठा फटका बसला आहे.
– आ.डॉ.बाबासाहेब देशमुख


























