टेंभुर्णी – ईदच्या पावन पर्वानिमित्त टेंभुर्णी शहरात आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झाले. शहरातील विविध मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीने ईदची नमाज अदा केली. या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल आत्राम (भा.पो.से.) यांनी नमाजानंतर मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील स्नेह व विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
ईद सणाच्या निमित्ताने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शहरातील संवेदनशील ठिकाणी दक्षतेने कर्तव्य बजावले. त्यामुळे संपूर्ण नमाज कार्यक्रम शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडला.
नमाज संपल्यानंतर अकलूज रोड, एसटी स्टँड परिसरात प्रभारी अधिकारी राहुल आत्राम यांनी स्वतः उपस्थित राहून नमाजासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. या स्नेहपूर्ण कृतीमुळे उपस्थित नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव उमटले.
या प्रसंगी अनेक नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, “धर्म वेगळे असले तरी आपण सर्व भारतीय एकच आहोत,” अशी भावना व्यक्त केली. या उपक्रमामुळे समाजात एकोपा, बंधुभाव आणि परस्पर आदराची भावना अधिक दृढ झाली.
ईद हा सण प्रेम, त्याग आणि एकमेकांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देणारा आहे. टेंभुर्णी पोलीस दलाने या उपक्रमातून केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडली नाही, तर समाजात एकतेचा आणि बंधुभावाचा प्रभावी संदेशही दिला.
या बंदोबस्तात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे, पोलीस हवालदार प्रदीप पर्वते, शिवाजी जाधव, केशव झोळ, दत्तात्रय वाघमारे, गणेश इंगोले तसेच इतर पोलीस अंमलदार व होमगार्ड यांनी सहभाग नोंदविला.























