सोलापूर – शहरात मार्चच्या मध्यापासूनच उष्णतेचा तीव्र प्रकोप जाणवू लागला असून तापमान ४० अंशांच्या दिशेने झेपावत आहे. वाढत्या उकाड्याच्या पार्श्वभूमीवर विजयपूर मार्गावरील हत्तूर ते सैफुलपर्यंतच्या रस्त्यावर मठ्ठा, ताक तसेच उसाच्या रसाच्या विक्रीला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या सावलीत अनेक विक्रेते थंड पेयांचे स्टॉल लावून बसले असून प्रवासी व नागरिक या पारंपरिक पेयांचा आस्वाद घेत उन्हापासून दिलासा मिळवत आहेत. विशेषतः दुचाकीस्वार व बाहेरून येणारे नागरिक या ठिकाणी थांबून ताक व मठ्ठा पिणे पसंत करत आहेत.
यंदा फेब्रुवारीच्या मध्यापासूनच उष्णतेची तीव्रता वाढलेली असून सकाळी दहापासूनच उन्हाचा तडाखा जाणवतो. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामानिमित्त शहरात येत असल्याने या मार्गावरील थंड पेयांच्या स्टॉलना अधिक मागणी वाढली आहे. साधा व मसाला मठ्ठा, ताक, लस्सी तसेच उसाचा रस असे विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत.
मंद्रूप, भंडारकवठे, टाकळी, धुळखेड तसेच कर्नाटकातील काही भागांतून येणारे प्रवासीही या ठिकाणी थांबून थंड पेयांचा आस्वाद घेताना दिसतात. मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत उष्णतेचा प्रकोप अधिक वाढणार असल्याने या व्यवसायाला चांगली चालना मिळत आहे.
दरम्यान, मठ्ठा व ताक विक्रीमुळे ग्रामीण भागातील काही युवकांना ३ ते ४ महिन्यांचा रोजगार उपलब्ध झाला आहे. बाटलीबंद थंड पेयांपेक्षा पारंपरिक व आरोग्यदायी पेयांना नागरिकांची अधिक पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
———-
“दिवसभरात सुमारे १५० लिटर मठ्ठा व ताकाची विक्री होते. उन्हाच्या तडाख्यात ग्राहकांना थंड व पौष्टिक पेय देताना समाधान मिळते. या निमित्ताने आम्हाला रोजगारही मिळतो. नागरिकांनी दुग्धजन्य पेयांना प्राधान्य द्यावे.”
— शिवा वाले, ताक विक्रेता (करजगी)
























