माढा – सोलापूर–पुणे राष्ट्रीय महामार्गावर मौजे शिराळ पाटीजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी हा अपघात घडला. यात बंडू बाळू लोकरे (वय ४०, रा. शिराळ टें., ता. माढा, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की लोकरे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
या अपघातात समोरील मोटरसायकलवरील सचिन सिद्धाराम परीट (वय २७, रा. केगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.


















