सोलापूर : आचार्यश्री विशुद्धसागरजी मुनिराज लिखित ‘सोलहकारण भावना अनुशीलन’ या अत्यंत महत्त्वाच्या जैन आध्यात्मिक ग्रंथाचे प्रकाशन जैन संस्कृती संरक्षक संघ (जीवराज ग्रंथमाला) व मराठी अनुवाद डॉ. संजीव शहा यांनी केले आहे. या ग्रंथाचा विमोचन सोहळा 108 मुनिश्री सुप्रभसागरजी महाराज यांच्या हस्ते शिंगवी भवन, सम्राट चौक, सोलापूर येथे संपन्न झाला.
जैन धर्मातील सोलहकारण भावनांचे महत्त्व, त्यांचे चिंतन आणि आत्मकल्याणाच्या दृष्टीने त्यांचे अनुशीलन या विषयांवर प्रकाश टाकणारा हा ग्रंथ वाचकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आचार्यश्री विशुद्धसागरजी मुनिराज यांच्या आध्यात्मिक विचारांचा मराठी भाषेतून परिचय व्हावा आणि जैन तत्त्वज्ञान अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावे, या दृष्टीने मराठी अनुवाद महत्त्वपूर्ण आहे.
या विमोचन सोहळ्याप्रसंगी श्री. अरविंदजी दोशी आणि श्री. डी. आर. शहा-इंडी कर, संतोष शहा,अनुप दोशी, राजकुमार दोशी, सौ जोती शहा यांची उपस्थिती होती. या ग्रंथाच्या माध्यमातून जैन धर्मातील आध्यात्मिक विचारांचे चिंतन करण्याची प्रेरणा वाचकांना मिळेल, तसेच धार्मिक साहित्याच्या अभ्यासाला प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या ग्रंथाच्या प्रकाशनामुळे मराठी वाचकांना सोलहकारण भावनांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध झाली असून, जैन तत्त्वज्ञान आणि आध्यात्मिक विचारांच्या प्रसाराच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
Post Views: 14