सोलापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जुनी पेन्शन योजना, विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांचे अनुदान, टीईटी सक्ती आणि शिक्षकांची अशैक्षणिक कामांतून मुक्तता या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुरस्कृत उमेदवार प्रा. डॉ. बब्रूवाहन रोंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वेरी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामामुळे शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुकीची तयारी सुरू आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांमधील सुमारे ३५ हजार शिक्षकांशी थेट संवाद साधला आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासकांच्या आग्रहामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे रोंगे यांनी सांगितले.
शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त विविध ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरणे, विद्यार्थ्यांचे आधार व अपार आयडी तयार करणे, यू-डायसची माहिती अद्ययावत करणे, प्रशिक्षण पूर्ण करणे, विविध अभियानांचे अहवाल भरणे आणि नोंदवह्या सांभाळणे अशी अनेक अशैक्षणिक कामे करावी लागतात. त्यामुळे अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. शिक्षकांना या कामांतून मुक्त करून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुनी पेन्शन योजना, टप्पा-वाढ अनुदान, नवीन संचमान्यता रद्द करणे, वेतनश्रेणी, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, विमा संरक्षण, पारदर्शक भरती, सेवाज्येष्ठता, पदोन्नती आणि बदली धोरण या मुद्द्यांचाही संकल्पनाम्यात समावेश असेल. पात्र विनाअनुदानित शाळा-महाविद्यालयांना अनुदान मिळवून देणे आणि प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस अध्यक्ष सुरेश राठोड, सोमनाथ राठोड, किसन जाधव, अर्जुन खटके, प्रेमलता कांबळे, मारुती तोडकर, फरीद जमादार आदी उपस्थित होते.
मते खाण्यासाठी नव्हे, तर लढण्यासाठी उभा
आपण १७ वर्षे शिक्षक आणि प्राध्यापक म्हणून काम केले आहे. ही निवडणूक शिक्षक विरुद्ध संस्थाचालक अशी नसून शिक्षकांच्या प्रश्नांसाठीची लढाई आहे. ही पक्षीय नव्हे, तर बुद्धिवंतांची निवडणूक आहे. मते खाण्यासाठी नव्हे तर लढण्यासाठी मी उभा आहे. दत्तात्रय सावंत हे आमदार असताना त्यांनी कुठे कामे केले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेसह जय जोहार आदिवासी कर्मचारी वेल्फेअर असोसिएशनच्या सांगली व कोल्हापूर शाखेने पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले.
Post Views: 18