सोलापूर – नुकताच केंद्र शासनातर्फे मराठी, प्राकृत व पाली भाषेला शास्त्रीय भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. यापैकी प्राकृत भाषेचा विभाग वालचंद महाविद्यालय स्थापनेपासून अखंडपणे सुरू आहे. केंद्र शासनातर्फे पुरस्कृत केंद्रीय संस्कृत विद्यापीठाच्या माध्यमातून दुर्मिळ भाषांच्या जतनासाठी अभ्यास करणाऱ्या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. त्यामध्ये यावर्षी वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कनिष्ठ महाविद्यालय विभागातील 21 तर वरिष्ठ महाविद्यालय विभागातील 41 विद्यार्थ्यांना शासनाची ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे.
‘विद्यार्थ्यांनी या भाषेचा अभ्यास करून भारतीय ज्ञान परंपरेच्या संशोधनात भर घालावी. महाविद्यालयाच्या विपुल ग्रंथ-संपदेचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा.’ असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संतोष कोटी यांनी विद्यार्थी अभिनंदन कार्यक्रमात केले. नवीन शिक्षण प्रणालीतही विद्यार्थी आवडीने प्राकृत विषय घेत आहेत, संस्कृतीचे जतन करत आहेत.’ असे विचार प्राकृत विभाग प्रमुख डॉ महावीर शास्त्री यांनी व्यक्त केले.
उपप्राचार्य डॉ मनोहर जोशी, अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक जीवराज कस्तुरे, डॉ के आर राव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पुणे बोर्डात दोन विद्यार्थ्यांनी अर्धमागधी विषयात प्रथम क्रमांक पटकावून यावर्षी 21 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत असे आभार प्रदर्शन माधुरी शास्त्री यांनी सांगितले.
श्रुती येले, नंदिनी जाधव, नागमणी लोकुर्ते, सानिया सलगर, पूजा व्हंडरे, आकांक्षा तुनकी, ओंकार शिकातोलु, अंबादास चव्हाण, वर्षा जगनकर, इंद्रकुमार म्हेत्रे या विद्यार्थ्यांनी सलग तीन वर्षे स्वर्ण-शिष्यवृत्ती मिळवल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.


























