बार्शी – ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रकटदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री भगवंत महोत्सव २०२६ चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. बार्शी नगरपरिषद, श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती, बार्शी पंचायत समिती आणि श्री भगवंत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा केला जाणार आहे.
मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी श्री भगवंत प्रकटदिन साजरा होत असून, त्याआधी दि. २० एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत बार्शीकरांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये लोककलांचे सादरीकरण, मराठी नाटके, कीर्तन, भावगीत, भक्तीगीत तसेच मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुरेल गाण्यांच्या मैफिलींचा समावेश आहे.
या महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे प्रकाशन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, श्री भगवंत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब बुडूख, डॉ. बी. वाय. यादव, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, बाजार समिती सभापती विजय गरड, उपसभापती संतोष निंबाळकर, माजी नगराध्यक्ष असिफभाई तांबोळी, महोत्सव समिती अध्यक्ष सुभाष लोढा, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, विजय राऊत, ऍड. रणवीर राऊत, संतोष सूर्यवंशी, मुन्ना सोनीग्रा, श्रीधर कांबळे, शंकर वाघमारे, ॲड. राजश्री डमरे-तलवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा
महोत्सवाची सुरुवात दि. २० व २१ एप्रिल रोजी राज्यस्तरीय ‘सोंगी भारुड’ स्पर्धेने होणार आहे. दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी ६-३० वाजता लोकप्रिय ‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २२ एप्रिल रोजी ‘द फोक आख्यान’ या संगीतप्रधान सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लोककलेचा अनोखा आविष्कार सादर होणार आहे.
दि. २३ एप्रिल रोजी गाजलेले मराठी नाटक ‘ऑल दि बेस्ट’ रंगभूमीवर सादर होणार आहे.
दि. २४ एप्रिल रोजी कीर्तनकार ह. भ. प. शिवलीला पाटील यांचे कीर्तन तसेच त्यानंतर सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची भावगीत व भक्तीगीतांची मैफल होणार आहे.
दि. २५ एप्रिल रोजी गायक सुदेश भोसले व पार्श्वगायिका बेला सुलाखे यांच्या आवाजात हिंदी-मराठी चित्रपट गीतांचा ‘सुरीला सिलसिला’ कार्यक्रम रंगणार आहे.
दि. २६ एप्रिल रोजी बार्शीतील स्थानिक कलावंतांचा ‘संगीतमय रंगारंग’ कार्यक्रम तर दि. २७ एप्रिल रोजी ऐतिहासिक मराठी नाट्यप्रयोग ‘शिवायन’ सादर करण्यात येणार आहे.
मंगळवार, दि. २८ एप्रिल रोजी प्रकटदिनाच्या दिवशी श्री भगवंत मंदिरात पहाटे ४-३० वाजता ह. भ. प. जयंत बोधले महाराज यांचे कीर्तन होईल. सकाळी ८ वाजता श्री भगवंत उत्सव मूर्तीची शहरातून भव्य मिरवणूक, दिंडी व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत मॉर्निंग सोशल फाउंडेशनच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता शिवशक्ती अर्बन को-ऑप. बँकेच्यावतीने आकर्षक शोभेच्या दारुची आतिषबाजी करण्यात येणार आहे.
सदरचे सर्व कार्यक्रम श्री भगवंत मैदान येथे पार पडणार असून महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी शहर व तालुक्यातील सर्व नागरिकांनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.

























