पंढरपूर – नगरपरिषद व श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती यांच्या मध्ये संत तुकाराम भवन बांधताना झालेल्या कराराबाबतची त्वरीत पूर्तता करण्यात यावी या मागणीचे निवेदन येथील पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सौरभ थिटे पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना मंगळवारी दिले. दरम्यान या निवेदनावर त्वरीत माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्याची माहिती नगरसेवक थिटेपाटील यांनी सोलापूर तरुणभारत शी बोलताना दिली.
या निवेदना संदर्भात माहिती देताना नगरसेवक थिटे पाटील यांनी सांगितले की, संत तुकाराम भवनच्या जागेवर पंढरपूर शहर विकास आराखड्यात पूर्वी वेगळे आरक्षण होते. सदरहू संत तुकाराम भवन ची जागा मंदिरे समितीला देण्यात आली त्यावेळेस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व पंढरपूर नगरपरिषद यांचे मध्ये सामंजस्य करार झाला. त्या करारातील अटींचा भंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने केला आहे. त्या काळातील काही बाबींची तात्काळ पूर्तता करणेत आली. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर मंडपाच्या खालील काही दुकान आहे मंदिरे समितीने पंढरपूर नगर परिषदेकडे हस्तांतरित केले. ते सर्व गाळे पंढरपूर नगरपरिषदेने १९८२ मध्ये जे विस्थापित झाले होते त्यांना देण्यात आले. त्याचे डिपॉझिट व भाडे पंढरपूर नगरपरिषदेला आज सुद्धा मिळत आहे.
दरम्यान त्यामधील दुसरी अट जी होती ती संत तुकाराम भवन बांधताना तळमजल्यावर तुकाराम भवनच्या सर्व बाजूने गाळे काढण्यात यावेत. समोरच्या (फ्रंट साईडला) बाजूला चार गाळे मोठे काढावेत, त्यातील दोन गाळे नगरपरिषदेला देण्यात यावेत व दोन गाळे मंदिर समितीने त्यांच्याकडे ठेवावेत. तुकाराम भवन च्या तीनही बाजूस दुकानात गाळे काढावेत व ते सर्व दुकान गाळे नगर पालिकेकडे हस्तांतरित करावीत पंढरपूर नगरपरिषदेने ते सर्व गाळे १९८२ मध्ये शहर विकास आराखड्यामध्ये विस्थापितांना (बाधीतांना) द्यावेत असे करारात ठरले होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने संत तुकाराम भवन बांधताना त्या पद्धतीने बांधकाम केले. परंतु नगर परिषदेने त्याचा पाठपुरावा न केल्याने ती नगरपरिषदेकडे हस्तांतरित न करता त्या दुकान गाळ्याच्या बाहेरच्या बाजूने भिंत बांधली व तेथील शटर्स आतल्या बाजूला लावली. आपण याची पाहणी करू शकता आज संत तुकाराम भवन मध्ये जो भोजन कक्ष आहे त्या भोजन कक्ष हॉलच्या पूर्व बाजूस ५-५ फुटाचे शटर्स लावलेली दिसतील. आतल्या बाजूचे ही शटर्स लावण्याची काय आवश्यकता होती ? कारण बांधकाम परवाना नगर परिषदेने देताना दुकान गाळ्यासहित बांधकाम परवाना दिला होता.
दरम्यान वापर परवाना देताना त्याबाबत नगर परिषदेने योग्य लक्ष दिले नाही. नगर परिषदेने योग्य लक्ष दिले असते तर अंदाजे ४० ते ५० दुकान गाळे १९८२ च्या विस्थापितांना मिळाले असते. आता नगर परिषदेने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून सर्व दुकान गाळे हे दिलेल्या बांधकाम परवान्या प्रमाणे तयार करून घ्यावेत आणि ते दुकान गाळे १९८२ च्या विस्थापितांना, दुकानदारांना आणि तुकाराम भवन जागेतील बाधितांना अग्रक्रमाने द्यावेत असे देखील निवेदना मध्ये नमूद केल्याचे नगरसेवक थिटे पाटील यांनी सांगितले.


























