सोलापूर – “ज्या व्यक्तीचे मन स्वस्थ असते, त्याचे शरीरही निरोगी राहते. जो माणूस मनाने सतत आजारी असतो, तो शरीरानेही आपोआप आजारी पडतो,” असे परखड मत संत शिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महाराज यांचे शिष्य निर्यापक श्रमण मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज व्यक्त केले
वीरसागरजी महाराज यांचे ‘ध्यान शिबिर’ बाळीवेस येथील गांधी नाथा रंगजी जैन बोर्डिंगच्या मैदानावर मंगळवारी उत्साहात पार पडले. यावेळी उपस्थितांना ध्यानावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मुनीश्री पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या जीवनात चिंता असतेच. मात्र, भविष्याची अतिचिंता केल्यास मानसिक आजार जडू शकतात. एक भविष्याची चिंता आणि दुसरी शरीरात होणाऱ्या बदलांची चिंता यामुळे माणूस त्रस्त होतो. त्यामुळे आपली मानसिकता मजबूत करायला शिका. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात संकटे येतात, वास्तवापासून पळून काहीही साध्य होत नाही. जे घडणार आहे, त्याचा सामना करावाच लागेल.
ध्यानाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले,
जगातील सामर्थ्यवान व्यक्तीही देवाकडे जाताना ‘माझ्या आयुष्यात दुःख नसावे, कुटुंबात शांतता लाभावी आणि मला कधीच कष्टाचा सामना करावा लागू नये’ अशी प्रार्थना करते. पण हे सर्व मिळवण्यासाठी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ध्यानाची नितांत गरज आहे. ध्यान केल्याने आपले मन इतके मजबूत होईल की त्याला कधीही आजारपण येणार नाही. मन खंबीर असेल तर हृदयविकार किंवा कोमासारख्या गंभीर समस्यांपासूनही रक्षण होऊ शकते. या धकाधकीच्या जीवनात स्वतःला वाचवण्यासाठी मन मजबूत करणे गरजेचे असून त्यासाठी ‘ध्यान’ हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
——–
ध्यान, प्रवचन व पाठशाळेचा लाभ घ्यावा
दररोज सकाळी साडेसहा वाजता त्यांचे ध्यान शिबिर बाळीवेस येथील गांधी नाथा रंगजी जैन बोर्डिंगच्या मैदानावर व शुक्रवार पेठेतील महावीर सांस्कृतिक भवन येथे सव्वा आठ वाजता प्रवचन असून मुनीश्री १०८ वीरसागरजी महाराज संघस्थ धवलसागरजी महाराज यांचे दररोज संध्याकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत “पाठशाळा” घेणार आहेत. सर्व समाज बांधवांनी आपल्या पाल्यांसहित लाभ घ्यावा, असे आवाहन श्री आदिनाथ महाराज दि.मंदिर ट्रस्ट व सकल जैन समाज सोलापूर यांनी केले आहे.
























