देगलूर – स्वातंत्र्यसेनानी पोशट्टीदादा उनग्रतवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित १९ व्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते डॉ. विश्वधार देशमुख यांनी मानवी उत्क्रांती, सभ्यता आणि शिक्षणाच्या मूळ संकल्पनांवर अत्यंत प्रभावी व विचारप्रवर्तक भाष्य केले. दि २४ मार्च रोजी (मंगळवारी) देगलूर येथील आयोजित व्याख्यानमालेत डॉ. देशमुख म्हणाले की, आजच्या समाजातून ग्रॅडमदर टच हरवला असून “शिक्षण, समाज आणि संस्कृतीच्या बेरजेतूनच मानवी सभ्यतेची निर्मिती” होते असे ते सांगितले.
स्वातंत्र्यसेनानी पोशट्टीदादा उनग्रतवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मागील १९ वर्षांपासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते. काल दि. २४ मार्च रोजी (मंगळवारी) प्रमुख वक्ते डॉ. विश्वधार देशमुख यांनी “शिक्षण, समाज आणि संस्कृती” याविषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या भाषणात डॉ. देशमुख म्हणाले की, सुमारे २० लाख वर्षांपासून चालू असलेल्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून होमो सेपियन्स हा जीव सृष्टीचा केंद्रबिंदू कसा झाला, हे समजून घेणे म्हणजे मानवी सभ्यतेचा प्रवास समजून घेणे होय. “मानव सृष्टीचा स्वामी झाला, त्यामागे शिक्षण, समाज आणि संस्कृती यांची बेरीज आहे,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांनी तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, येशू ख्रिस्त, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी मानवी सभ्यतेला आदर्श घालून दिला आहे. तर दुसरीकडे हिटलर, चंगेज खान यांसारख्या विनाशकारी प्रवृत्तींचाही दाखला दिला.
दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यसेनानी पोशट्टीदादा उनग्रतवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच प्रा. गौतम भालेकर व प्रकाश सोनकांबळे यांनी भक्तीगीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. यावेळी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार, सहसचिव राजकुमार महाजन, कार्यकारणी सदस्य देवेंद्र मोतेवार, सदस्य रविंद्र अप्पा दयाडे, सदस्य विजय उनग्रतवार, प्राचार्य मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, डॉ. जनार्दन भुमे, डॉ. विनायक मुंडे, डॉ. सर्जेराव रणखांब, डॉ. संजय देबडे, डॉ. माधव चोले, कवी लक्ष्मण मलगिलवार, जेष्ठ सेवानिवृत्त शिक्षक एच.एस. खंडागळे यांच्यासह आदीं मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ देशमुख भाष्य करताना म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीत एक ‘महामानव’ दडलेला असतो आणि त्या बीजाला अंकुरित करण्याची प्रक्रिया म्हणजे खरे शिक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समाज ही केवळ जात किंवा पोटजात नसून नीती आणि नियमांनी बांधलेला समूह आहे, असे स्पष्ट करत त्यांनी सध्याच्या संकुचित विचारसरणीवर टीका केली.
संस्कृती ही धर्मापुरती मर्यादित नसून ती प्रदेश, परंपरा आणि जीवनशैलीची व्यापक अभिव्यक्ती असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. अशोक टिपरसे यांनी मांडले. तर या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.





















