वेळापूर – सरकार म्हणतेय राज्य प्रगती पथावर आहे,या सरकारने एकही धरण तर बांधले नाहीच पण आहे त्या धरणाचे फाटे ही बांधले नाहीत,नीरा देवघर कालव्याच्या कामावर शासनाने २०० कोटी रुपये खर्च केले पण प्रत्यक्षात मात्र १० ते १२ कोटीचीच कामे झाली असल्याचा घणाघात माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी केल्यानंतर राज्याचे जसंपदामंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी माळशिरस मधील अवर्षणग्रस्त १६ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी शासन आग्रही असल्याचे सांगितले.
राज्याच्या विधानसभा अधिवेशनात माळशिरस तालुक्यातील २२ गावांना नीरा देवघर धरणाचे पाणी मिळावे यासाठी आग्रही भूमिका मांडताना आ.जानकर यांनी सांगितले की गेली ३० वर्षांपासून नीरा देवघरचा फाटा न झाल्याने आम्ही पाण्याच्या प्रतीक्षेत आहोत .माणसांना व जनावरांना ३० वर्षांपासून पाण्याअभावी यातना भोगाव्या लागत आहेत.
आता तर एकही तरुण या २२ गावांमध्ये राहण्यास तयार नाही.मी गेली १० वर्षांपासून यासाठी प्रयत्न करत आहे,आत्तापर्यंत अधिवेशनात ४ वेळा हा प्रश्न मांडला आहे,मात्र त्यामध्ये कसलीही प्रगती होत नाही.
गेल्या वर्षीच्या अधिवेशनात शासनाने या कामासाठी २४७ कोटी रुपयांची तरतूद केली होती.मात्र यावर्षीच्या बजेट अगर पुरवणी मध्ये एक रुपयाची ही तरतूद केली नाही.
त्यामुळे आम्हाला या २२ गावांना पाणी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारकडे या कामासाठी पैसे नसतील तर बी ओ टी वर काम करा अशीही मंत्री महोदयांना विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने गेल्या वर्षी केलेल्या २४७ कोटीच्या तरतुदीततील २०० कोटी रुपये खर्च केले आहेत.मात्र मी त्याठिकाणी ३ वेळा जाऊन आलो आहे त्याठिकाणी १० ते १२ टक्के ही काम झाले नाही,ते फार तर १० ते १२ कोटी रुपयांचे काम झाले असल्याचा आरोप त्यांनी केला.
त्यास उत्तर देताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी धरणाच्या पहिल्या टप्प्यातील १६५ किमीचा खुला कालवा होता.त्यापुढील की जे माळशिरस तालुक्याच्या हद्दीतील येते ते बंदिस्त कालव्याचे काम असून त्या कामाला गती देण्यात येत आहे.गेल्या वर्षी या प्रकल्पाला २७४ कोटी रुपये मंजूर केले होते. त्यापैकी १९६ कोटी रुपये खर्च झाले आहेत.या बजेट मध्येही २८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.ही १६ गावे मुळ प्रकल्पात नव्हती,ती आम्ही समाविष्ट करून घेतली आहेत.त्याच्या सर्व्हेचे काम सुरू आहे.
निधीची अडचण नाही,आणि या कामाला बराच कालावधी होऊन गेला आहे हे मान्य करावे लागेल,या १६ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी सरकार आग्रही आहे, व तसे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
——————————————————————
माळशिरस तालुक्यात निरा देवघर योजनेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेली १६ गावे
शिंगोर्णी, बचेरी, सुळेवाडी, जळभावी, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ,भांब ,फडतरी, लोंढे मोहितेवाडी, कोथळे, काळमवाडी, कोळेगाव, पिलीव, चांदापुरी
मुळ प्रकल्पात असलेली तालुक्यातील गावे
गिरवी, पिंपरी, लोणंद,कण्हेर, इस्लामपूर,रेडे, माणकी, मोटेवाडी




















