पंढरपूर – महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान मुलांच्या सोशल मीडिया अतीवापराचा गंभीर मुद्दा आमदार समाधान आवताडे यांनी सभागृहात उपस्थित करत मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले.
या दरम्यान माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या विशेष टास्क फोर्सचे प्राथमिक निष्कर्ष काय आहेत आणि त्यांच्या शिफारसींची अंमलबजावणी चालू शैक्षणिक वर्षापासून करणार का, याबद्दल सभागृहात आमदार समाधानदादा आवताडे साहेब यांनी विचारणा केली.
मुलांच्या दैनंदिन मोबाईल गेमिंग वेळेवर वेळ मर्यादेचे नियंत्रण तसेच, गेमिंग कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे काय पाठपुरावा करत आहे, याबद्दलही विचारणा केली. यासोबतच, राज्यातील शाळांमध्ये ‘स्क्रीन फ्री सॅटरडे’ हा उपक्रम राबविण्यासाठी शासनाने कुठली स्वतंत्र नियमावली तयार केली आहे का, हा प्रश्न उपस्थित केला.
या उपस्थित सर्व प्रश्नांवर माहिती व तंत्रज्ञान मंत्री श्री. आशिषजी शेलार यांनी सकारात्मक भूमिका घेत प्राथमिक निष्कर्षाचा अहवाल पुढील तीन महिन्यात येणे अपेक्षित असून या अहवालानुसार ठोस पावले उचलण्यात येतील, असे स्पष्ट केले. तसेच, ‘स्क्रीन फ्री टाईम’ या विषयी शिक्षण विभागाशी चर्चा या टास्क फोर्स मध्ये होईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
























