मुदखेड – तालुक्यातील नागेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत, नुकताच आकाशवाणी नांदेड केंद्राचा ‘श्रोता संवाद मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला.
या माध्यमातून आकाशवाणीने ग्रामीण भागातील श्रोत्यांशी थेट संवाद साधत, शेती, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाची सुरुवात शहीद दिनानिमित्त क्रांतीकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी आकाशवाणी नांदेडचे कार्यक्रम अधिकारी राहुल आत्राम आणि प्रसिद्ध निवेदक मधुकर गजभारे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत पुष्पहार व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुमधुर स्वागत गीताने करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना कार्यक्रम अधिकारी राहुल आत्राम म्हणाले की, “विद्यार्थी हा पालक आणि शिक्षकांच्या संस्कारातूनच घडत असतो. शाळा ही सुजाण नागरिक तयार करण्याचे पवित्र ठिकाण आहे.” शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या शिस्तीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तर निवेदक मधुकर गजभारे यांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करत, निसर्गरम्य शाळा पाहून मन प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली.
शेतकरी व महिलांशी सुसंवाद
या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे गावातील महिला बचत गट आणि प्रगतीशील शेतकऱ्यांशी साधलेला संवाद. यावेळी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या, ज्यात शेतीतील कष्ट, आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातून मिळणारे उत्पन्न यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला बचत गटांनीही आपले अनुभव कथन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका धर्मश्री दु. मो. लोणे-लहानकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दोन-तीन वर्षांपासून नागेली येथील विद्यार्थी आकाशवाणीच्या ‘गंमत-जंमत’ या कार्यक्रमासाठी नियमित सादरीकरण करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘पाणी थेंबे थेंबे वाचवा’ ही नाटिका आणि ‘चवदार तळ्याचे पाणी’ ही कविता सादर केली होती. या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी गव्हाणे, उपाध्यक्ष विजयकुमार शिंदे, चेअरमन काशीराम कुराडे, पोलीस पाटील यशवंतराव शिंदे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागराज कांबळे यांनी केले, तर आभार राजेश टोम्पे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीणा कदम, सुचिता रासवंते, कविता रासवंते, दत्ता रासवंते आणि शिवप्रसाद यांनी विशेष परिश्रम घेतले.





















