सोलापूर – बार असोसिएशन तर्फे दि. 26, 28 व 29 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये एकूण 16 पुरुष वकिलांच्या संघांनी तसेच 3 महिला वकिलांच्या संघांनी सहभाग नोंदविला होता. सर्व संघांनी क्रीडाभावना जपत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
पुरुष गटामध्ये सोलापूर बार असोसिएशनचा “ॲडव्होकेट ब्लॅक पॅन्थर”संघ विजेता ठरला. अंतिम सामन्यात त्यांनी पंढरपूर वकील संघाचा 22 धावांनी पराभव करून चषक पटकावला.
स्वर्गीय विश्वनाथ फताटे यांच्या स्मरणार्थ अॅड. विक्रांत फताटे यांच्या सौजन्याने विजेत्या संघाला चषक प्रदान करण्यात आला. तसेच प्रथम पारितोषिक स्व. दत्तात्रय जोशी यांच्या स्मरणार्थ अॅड. निलेश जोशी यांच्या सौजन्याने रुपये 11,000/- *कर्णधार अॅड. मुनीनाथ कारमपुरी व संघातील सर्व खेळाडूंना देण्यात आले. उपविजेत्या संघास अॅड. सागर घाटे यांच्या सौजन्याने रक्कम रुपये 7,000/- पारितोषिक प्रदान करण्यात आले.
वैयक्तिक कामगिरीत मॅन ऑफ द सिरीज हा किताब अॅड. अभिषेक थोरात यांनी पटकावला. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अॅड. आकाश देशमुख (पंढरपूर), उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अॅड. महेश इजामुरी, तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी अॅड. शक्तिमान माने (पंढरपूर) यांचा गौरव करण्यात आला.
महिला गटामध्ये “लीगल स्ट्रायकर” संघ विजेता ठरला, तर “लीगल दिवाज” संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश स्मिता घारगे तसेच सोलापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते साहेब उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर बार असोसिएशनचे ज्येष्ठ वकील अॅड. एस. आर. पाटील व अॅड. मंगला चिंचोलकर उपस्थित होते.
यावेळी बारचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब जाधव, उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, अॅड. मंगला चिंचोलकर, प्रमुख पाहुणे जयदीप मोहिते व स्मिता घारगे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारचे सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिवा अॅड. मीरा प्रसाद यांनी मानले. या प्रसंगी मोठ्या संख्येने वकील बंधू-भगिनी उपस्थित होते.

















