सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या उद्देशाने छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, कला व वाणिज्य, सोलापूर येथील राज्यशास्त्र विभागामार्फत बी.ए. व एम.ए. भाग १ व २ च्या विद्यार्थ्यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय सभेचे कामकाज पाहिले. राज्यशास्त्राचे धडे घेतले.
सोलापूर महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेचे कामकाज या विद्यार्थ्यांनी पाहिले. प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांचा राज्यशास्त्र विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महापौर कोंड्याल त्यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय प्रक्रियेचे महत्त्व, शहर विकासातील प्राधान्यक्रम तसेच लोकप्रतिनिधींची जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. राज्यशास्त्राचे धडे घेऊन शहर विकासासाठी विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प मांडणीची प्रक्रिया, महसूल व खर्चाचे नियोजन, विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदी तसेच नगरसेवकांमधील चर्चा यांचा बारकाईने अभ्यास केला. प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांचे महत्त्व याविषयीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळाली. या शैक्षणिक भेटीत बी.ए. व एम.ए. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. विद्यार्थ्यांनी सभेतील विविध मुद्द्यांवर नोंदी घेतल्या असून त्या आधारे प्रोजेक्ट तयार करण्यात येणार आहे.
प्रत्यक्ष कामकाज पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या राजकीय सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक जोड मिळाली.यावेळेस सोलापूर महानगरपालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. वाल्मिकी कीर्तीकर , प्रा. नवनाथ कुचेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
















