देगलूर – भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर देशात सांसदीय लोकशाही व लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार करण्यात आला.
राज्यघटनेनुसार कायद्याचे राज्य, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, दर्जा व संधीची समानता , धर्मनिरपेक्षता , समाजवाद , इत्यादी आदर्श मानवी लोकशाही मुल्यांचा स्वीकार करण्यात आला. आदर्श स्वरुपाची शासन व प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या शासन व प्रशासन व्यवस्थेत निसर्गतः लोकसंख्येत 50 टक्के वाटा असलेल्या महिलांना दर्जाची व संधीची समानता या तत्वानुसार आर्थिक,सामाजिक,राजकीय, प्रशासकीय व व्यावसायिक क्षेत्रात समानता प्राप्त होणे आवश्यक होते. परंतु पुरुषप्रधान संस्कृती प्रभावामुळे महिला व मागासवर्गीय या दोन्ही समाज घटकाला उपेक्षित व वंचित जीवन जगावे लागत होते.
अलीकडच्या काळात शिक्षणाच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासाला निर्णायक वळण प्राप्त झाले आहे. गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून ते देशाच्या सर्वोच अशा महामहीम राष्ट्रपतीपदापर्यंत महिलांनी गरुडझेप घेतली आहे.
महिला सक्षमीकरण चळवळ अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी पुरुषांच्या विचार व वर्तनात बदल आवश्यक आहे,असे प्रतिपादन देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा.डॉ.बा.रा.कत्तुरवार यांनी केले आहे. ते महाराष्ट्र उद्योजगता विकास केंद्र महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ व जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्यावतीने देगलूर येथे आयोजित केलेल्या सेंसीटायझेशन आणि क्षमता वृद्धीवर आधारित कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीस्थानी कार्यशाळा समन्वयक शीतल अजित वरणे ह्या होत्या.
सर्व महिला वर्गाला शासन, प्रशासन व उद्योग क्षेत्रातील दुहेरी जबाबदारी पार पाडवी लागते. एक म्हणजे कौटुंबिक आणि दुसरी म्हणजे शासन, प्रशासन व उद्योग क्षेत्रातील जबाबदारी होय. महिला अधिकारी , कर्मचारी व उद्योजक वर्गाला पुरुषांच्या तुलनेत अधिक संघर्ष व एक प्रकारे तारेवरची कसरत करावी लागते. त्यासाठी महिला व पुरुष या दोन्ही घटकांनी आपण एका आदर्श कुटुंबरुपी रथाचे दोन चाके आहोत आशा स्वरुपात परस्परांना समजून घेतले पाहिजे, कुटुंबातील दोन्ही चाके समान असून यातील कोणताही एक चाक रुतला किंवा डगमगला तर त्याचा प्रतिकूल परिणाम समग्र कुटुंबावर होत असतो. त्यासाठी महिला सक्षमीकरण चळवळ यशस्वी करण्यासाठी पुरुषांच्या विचार व वर्तनात बदल आवश्यक आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी तालुक्यातील नवोदित महिला उद्योजक उपस्थित होते.





















