सोलापूर : शहरातील कोंतम चौक येथे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरणानंतर पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले. अनावरण व पूजनाचा कार्यक्रम आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. अनावरणानंतर पुतळ्याचे विधीवत पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, मनिष काळजे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, नगरसेवक अक्षय आजीखाने, नगरअभियंता सारिका आकूलवार, प्रकाश दिवानजी, आनंद मुस्तारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोंतम चौक परिसरात महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासह व्यापक सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून पुतळ्याची दुरुस्ती करून पुनःस्थापना करण्यात आली आहे. या कामामुळे परिसराचे सौंदर्य अधिक खुलणार असून, नागरिकांच्या सोयीसुविधांचा विचार करून उर्वरित सुशोभीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे.
दरम्यान, महापौर विनायक कोंड्याल यांनी महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये महात्मा बसवेश्वर परिसर सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
महात्मा बसवेश्वरांचा पुतळा दुरुस्ती करून पुन्हा बसविण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कोंतम चौकाचा परिसर अधिक आकर्षक व सुशोभित होणार आहे.
























