पुणे – राज्यातील क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी क्रीडा विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आस्थापनेवरील ३ जिल्हा क्रीडा अधिकारी, गट-अ (राजपत्रित) दर्जाच्या अधिकाऱ्यांना उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, गट-अ या पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचा आदेश शासन स्तरावरून जारी करण्यात आला आहे.

क्रीडा विभागाचे उपसचिव आबासाहेब कवळे यांच्या स्वाक्षरीने १५ जुलै रोजी हा अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला. सन २०२५-२६ च्या निवडसूचीनुसार, ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे या अधिकाऱ्यांची पदोन्नती व नवीन पदस्थापना निश्चित करण्यात आली आहे. पदोन्नती व नवीन पदस्थापना लातूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील महादेव कसगवडे यांची नागपूर येथे क्रीडा उपसंचालक या रिक्त पदावर पदोन्नती झाली आहे. चंद्रपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना अमरावती विभागाच्या क्रीडा उपसंचालक या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. क्रीडा संचालनालय पुणे मुख्यालयाचे सहायक संचालक मिलिंद दीक्षित यांची लातूर विभागाच्या क्रीडा उपसंचालक या पदावर पदोन्नती झाली आहे.





















