बार्शी – तालुक्यातील काटेगांव येथील आरोग्य उपकेंद्रातील गंभीर निष्काळजीपणामुळे एका ३८ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. रमीज (राजू) उमर पटेल असे मृत तरुणाचे नाव असून, ऐन आणीबाणीच्या क्षणी उपकेंद्रात एकही डॉक्टर हजर नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी रमीज पटेल यांना राहत्या घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. कुटुंबीयांनी कोणताही वेळ न दवडता त्यांना तातडीने काटेगाव येथील आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. मात्र तेथे एकही डॉक्टर उपस्थित नसल्याने योग्य व तात्काळ उपचार मिळू शकले नाहीत. उपस्थित कर्मचाऱ्यांकडूनही आवश्यक वैद्यकीय मदत मिळाली नसल्याने रमीज यांची प्रकृती अधिकच गंभीर होत गेली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, या उपकेंद्रातील डॉक्टरांच्या अनियमिततेबाबत ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा जिल्हा व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी सादर केल्या होत्या. तरीही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वेळेवर डॉक्टर उपलब्ध असते, तर रमीजचे प्राण वाचले असते, अशी तीव्र प्रतिक्रिया मृताच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर काटेगाव परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी जोरदार टीका केली आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या बेफिकीर यंत्रणेविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दोषी डॉक्टर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई न झाल्यास येत्या दोन दिवसांत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या घटनेमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या असून, प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.



























