सोलापूर – जिल्हा परिषद विषय समिती सदस्यांच्या निवडीदरम्यान मतदान होण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच दुपारच्या नाट्यमय घडामोडींनी राजकारणाला वेगळी दिशा दिली. अक्कलकोट तालुक्यातील तरुण नेत्यांमध्ये झालेल्या समन्वयामुळे ‘युवा मैत्री’चा नवा अध्याय जिल्हा परिषदेत पाहायला मिळाला.
अक्कलकोटमधील सदस्य शिवराज म्हेत्रे आणि प्रवीण तानवडे यांनी स्थायी, बांधकाम आणि समाजकल्याण समित्यांसाठी अर्ज दाखल केल्याने निवडणूक होण्याची शक्यता बळावली होती. स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष जिल्हा परिषदेतही उमटणार का, अशी चर्चा रंगली होती.
मात्र, या पार्श्वभूमीवर सिद्धाराम मैत्री यांचे चिरंजीव शिवराज म्हेत्रे यांनी मोठेपणा दाखवत माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने यांच्या समर्थनार्थ स्थायी समिती सदस्यपदाच्या शर्यतीतून माघार घेतली.
या निर्णयामुळे राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आणि युवा नेतृत्वातील सुसंवाद अधोरेखित झाला.
दरम्यान, प्रवीण तानवडे यांनीही परिस्थिती न ताणता ‘ऍडजस्टमेंट’चा मार्ग स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी समाजकल्याण व बांधकाम समित्यांमधील दावेदारी मागे घेतली. या समन्वयानंतर समित्यांच्या वाटपात संतुलन साधण्यात आले. नव्या समीकरणानुसार शिवराज म्हेत्रे यांना शिक्षण व कृषी समित्यांवर संधी मिळाली, तर प्रवीण तानवडे यांची अर्थ समितीत वर्णी लागली. या घडामोडींमुळे दोन्ही नेत्यांनी आपले राजकीय गणित व्यवस्थित बसविल्याचे चित्र स्पष्ट झाले.


























