सांगोला – तालुक्यातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सहविचार सभा पेन्शनर संघटनेच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली. सदर सभेसाठी महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेचे पुणे विभागाचे अध्यक्ष सिद्धेश्वर धसाडे प्रमुख पाहुणे तर अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक अर्जुन शिंदे होते.
यावेळी व्यासपीठावर संचालक दिनकर घोडके, एकनाथ जावीर, विलास नलवडे, गंगाराम इमडे उपस्थित होते. यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सिद्धेश्वर धसाडे यांनी सन २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे वेतन वाढ मिळविण्यासाठी राज्य संघटनेमार्फत पाठपुरावा करून मिळवून देणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व सेवानिवृत्त बांधवांनी सांगोला तालुक्यातील पेन्शनर संघटनेला बळ द्या असे संबोधित केले. यावेळी दिनकर घोडके, विलास नलावडे यांनी सन २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे वेतन वाढ मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी लागणारी कागदपत्रे त्वरित जमा करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी सेवानिवृत शिक्षक मच्छिंद्र मोहिते यांनी मातोश्री स्व.यशोदा मोहिते यांच्या स्मरणार्थ २० खुर्च्या संघटनेस भेट दिल्या. सभेचे नियोजन सहसचिव खामकर गुरुजी, प्रास्ताविक संचालक शंकर सावंत गुरुजी यांनी केले. दिनकर घोडके यांनी आभार मानले.






















