सोलापूर – इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये अक्कलकोट तालुक्यात सर्व माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावत तसेच सोलापूर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवणारी कुमारी विबोधी यादव ही विद्यार्थिनी आपल्या उल्लेखनीय यशामुळे सर्वांच्या कौतुकाचे धनी ठरली आहे. विबोधीला मिळालेली शिष्यवृत्ती रक्कम स्वतःसाठी न वापरता तिने आपले आजोबा समाजसेवक शिक्षण प्रेमी स्व. बाळासाहेब हांडे यांचा कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजोपयोगी कार्यासाठी खर्च करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला.
त्यांचा विचाराचा वारसा पुढे नेत विबोधीने शिक्षणाच्या क्षेत्रात योगदान देण्याचा संकल्प या भावनेतून तिने शिक्षणाच्या उन्नतीसाठी ती शिकत असलेली शाळा मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला दुधनी व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिवाजीनगर तांडा दुधनी येथील माजी मुख्याध्यापक पोमू राठोड या दोन शाळांना आपली संपूर्ण शिष्यवृत्ती रक्कम प्रदान केली. तिच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनसामग्री सुविधा व प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.
विबोधीचा आदर्श हे केवळ शैक्षणिक यशा पुरता मर्यादित नसून समाजसेवेची जाणीव कृतज्ञतेची भावना याचे सुंदर उदाहरण आहे. तिच्या कार्यामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळत असून शिक्षणासोबतच समाजासाठी काहीतरी करण्याची भावना अधिक दृढ होत आहे. विबोधीच्या या स्तुत्य कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन होत आहे.

























