अकलूज – शहराची होत असलेली वाढ, वाढणारी लोकसंख्या, त्यानुसार वाढलेली वाहने आणी त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर उपाय काढण्यासाठी आज आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदूभाऊ सांस्कृतिक हॉलमध्ये नागरिक व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील, डी. वाय. आर.टी.ओ. अमरसिंह गवारे, आर.टी.ओ.पोंदकुळे, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सार्व. बांधकाम अभियंता सुनीता पाटील, सर्व नगरसेवक, पं. स. सदस्य, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
आ. मोहिते पाटील म्हणाले, शहरातील पार्किंग आणी वाहतुकीला शिस्त नाही. अल्पवयीन मुले मोटार सायकली पळवत आहेत. रिक्षाना परवाने नाहीत. मोठे व्यापारी, दवाखाने, बँका यांच्या समोर वाहणांची अस्ताव्यस्त गर्दी होतेय. वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. अकलूज शहरातील गर्दीच्या भागामध्ये लवकरच एकतर्फी वाहतूक, सम विषम तारखेला पार्किंग असे उपक्रम राबवले जाणार आहेत. नागरिकांनी स्वयं स्फूर्तीने वाहने चालवावीत आणी वाहतुकीला अडथळा न करता पार्किंग करावीत असे आवाहन त्यांनी केले.
अल्पवयीन वाहन चालक मुलांच्या पालकांना सावधानतेचा इशारा देताना आर. टी. ओ. अमरसिंह गवारे म्हणाले, अल्पवीन मुलगा किंवा मुलगी वाहन चालवताना सापडले तर त्यांना सुमारे 25 हजार रुपये दंड, पालकांना अटक व सदर मुलांना वयाच्या 25 वर्षा पर्यंत लायसन काढता येणार नाही अशी दंडाची तरतूद आहे. म्हणून पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये.
व्यापारी, व्यावसाईक, किरकोळ विक्रेते यांचे अतिक्रमण व बेशिस्त पार्किंग यांच्यामुळे रस्त्याच्या रुंदीचा पुरेपूर उपयोग वाहतुकीसाठी होत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होतेय. कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी नागरिकांना सोसत नाही. त्यामुळे नागरिकांनी स्वतःच शिस्त पाळावी असे आवाहन पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी केले. यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या बोलून दाखवल्या.



























