अकलूज – पाणी वितरणात पैसे खाता येत नाहीत म्हणून जलसंपदा विभागाचे स्थानिक श्रेणीतील अधिकारी पाणी वाटप संस्था बंद पाडण्याचे कट रचत असल्याचा सणसणीत आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला .माळशिरस तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी अकलूज येथे विशेष बैठक आयोजित केली होती त्या बैठकीत खासदार धैर्यशील यांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला .
पुढे बोलताना धैर्यशील मोहिते – पाटील म्हणाले की , मी उगाच बिनबुडाचे आरोप करत नाही . हे मी पुरवण्याची सिद्ध करून दाखवू शकतो .माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांना वारंवार बैठका घेऊन आपल्या हक्काचे पाणी आरक्षित करण्यासाठीआम्ही सांगत आलो आहे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले .
जलजीवन मिशन कामांमध्ये अनियमितता असल्याने याची अधिकांश कामे रखडली आहेत .केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले .
या बैठकीसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते – पाटील , आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील ,अकलूजचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते – पाटील ,तहसीलदार सुरेश शेजुळ ,जलसंपदा खात्याचे उपअभियंता श्रवण नहार , भीमा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता कल्याणराव देशमुख , सतीशबाबा माने – देशमुख , वनाधिकारीआटोळे यांसह विविध खात्याचे अधिकारी अनेक गावातील सरपंच -उपसरपंच व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .
वन खात्यामुळे अनेक विकास कामांना खीळ बसत असल्याचा आरोप नागरिकांनी या बैठकीत केला .यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी वन अधिकाऱ्यांना शेलक्या शब्दात खडसावले . मी कधीही कुठल्या अधिकाऱ्यांना असे बोल बोलत नाही परंतु नागरिकांच्या हिताला बाधा आणणार असाल तर गप्पही बसणार नाही असे आमदार रणजितसिंह यांनी बजावले . वनखात्याने अडवणूक केलेल्या कामासंदर्भात सोमवारी तहसील कार्यालयात वन विभागाने बसून सर्व कामाचा निपटारा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या .
निरा कालव्यातून उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन कधी सुरू होणार याकडे आमदार रणजितसिंह यांचे लक्ष वेधले असता पुढील चार दिवसात हे आवर्तन सुरू होईल असे उपअभियंता श्रवण नहार यांनी सांगितले .भीमा पाटबंधारे विभागाकडील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधार्याच्या दुरुस्तीसाठी गतवर्षी ७०० बर्गे व यंदा ६००बर्गे उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आले .
माळशिरस तालुक्यात गत निवडणुकी वेळी सुमारे ३ लाख ५० हजार मतदार होते .एसआरआय च्या मॅपिंग नुसार तालुक्यात आतापर्यंत केवळ २ लाख ७० हजार मतदार अधिकृत ठरले आहेत . राहिलेल्या व वाढीव मतदारासंदर्भात नागरिकांनी सजग राहण्याचे आवाहन आमदार रणजितसिंह व खासदार धैर्यशील मोहिते – पाटील या बंधूंनी केले .मतदारांनी हा विषय गांभीर्याने घ्यायला हवा .


























