सोलापूर – घरगुती तसेच व्यावसायिक एलपीजी गॅसच्या दरवाढीविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने ‘चूलपेटो’ आंदोलन करण्यात आले. वाढत्या गॅस दरामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असून महागाईचा फटका बसत असल्याचा आरोप करत या आंदोलनातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी प्रतीकात्मक चूल पेटवून भाकरी थापत सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त केली. थापलेल्या भाकऱ्या केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
यावेळी उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनीही सरकारवर निशाणा साधत म्हटले, “निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला जातो आणि तोच पैसा महागाईच्या माध्यमातून जनतेकडून वसूल केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न गंभीर झाले असतानाही सरकार निष्क्रिय आहे.
जिल्हा प्रमुख शरणराज केंगनाळकर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत, “सध्याचे सरकार सर्वसामान्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून त्यांचे राजकारण फक्त सत्तेसाठी आहे,” असे म्हटले. महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका करताना सांगितले की, “महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. सरकारकडून केवळ दिखाऊ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.”
महिला पदाधिकारी स्वाती रूपनर आणि प्रभावती यलगुंडे यांनीही महिलांवर वाढत्या महागाईचा मोठा परिणाम होत असल्याचे सांगत सरकारवर टीकास्त्र सोडले.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर, जिल्हा संघटक मंगल थोरात, लोकसभा प्रमुख संजय पोळ, राजा कुसेकर, दत्ता माने, कृष्णा सुरवसे, शिवा माळी, सुशील उपलप, तुषार खंदारे, विद्या घोडके यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

























