सोलापूर – येथील इंदिरा गांधी क्रिकेट स्टेडियमवर ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडिया’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंध महिलांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा उत्साहात समारोप झाला. ५ मे ते २१ मे दरम्यान चाललेल्या या विशेष शिबिरासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून २५ अंध मुली सहभागी झाल्या होत्या.
या समारोप समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन उपस्थित होते. शिबिरात सहभागी झालेल्या मुलींच्या जिद्दीचे आणि आत्मविश्वासाचे कौतुक करताना कुशल जैन यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे टी-२० विश्वचषक विजेत्या अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कु. गंगा संभाजी कदम यांचा सीईओ कुशल जैन यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. गंगा कदम यांच्या या यशाने उपस्थित सर्वच प्रशिक्षणार्थी मुलींना एक नवी प्रेरणा दिली.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेबर्सू, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड इन इंडियाच्या कु. राजश्री रमावत, तसेच राजू शेळके आणि प्रशिक्षक उपस्थित होते.





















