
सोलापूर – आगामी आषाढी वारी लक्षात घेता लाखो वारकऱ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेसाठी आरोग्य विभागाने व्यापक पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात दि. २१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या आषाढी वारी पूर्वतयारी नियोजन बैठकीत जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी “वारकऱ्यांची सेवा हीच खरी सेवा असून, प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करून वारी यशस्वी करावी,” असे सांगत आरोग्य विभागाने कोणतीही ढिलाई न करता जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश दिले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये आणि वारी सुरक्षित, सुव्यवस्थित पार पडावी यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यंदाच्या वारीत वाढते तापमान आणि साथीच्या आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे. वारकरी दिंड्यांच्या मार्गावर आणि मुक्काम स्थळांवर उष्माघात टाळण्यासाठी ओ.आर.एस.चे मोफत वाटप करण्यात येणार असून, वारकऱ्यांमध्ये आरोग्य जनजागृतीही केली जाणार आहे.
वारी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. विहिरी, टँकर, पाणीपुरवठा केंद्रे आणि मुक्काम स्थळांवरील सर्व पाण्याचे स्रोत नियमित तपासण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दूषित पाण्यामुळे होणारे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, वारी काळात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी २४ तास उपस्थित राहतील याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वारकऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी करून आवश्यक तेथे तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
कोट
वारी मार्ग व मुक्काम स्थळांवरील स्वच्छतेवर विशेष भर देत ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून साफसफाई, निर्जंतुकीकरण व कचरा व्यवस्थापन मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच सर्पदंश, अतिसार, ताप आणि इतर साथीच्या आजारांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.
– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर






















