
सोलापूर : शहरातील भद्रावती पेठ येथील श्री साई श्रद्धा संस्था, साई दरबार येथे आयोजित करण्यात आलेला “आंबा महोत्सव” भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संस्थेच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात श्री साईबाबांच्या दरबाराची आकर्षक आंब्यांनी सजावट करण्यात आली होती. विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवलेला साई दरबार भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला. दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी साईंचे दर्शन घेत भक्तिभाव व्यक्त केला.
गुरुपुष्य अमृत योगाच्या शुभ मुहूर्तावर आयोजित या महोत्सवात धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा तसेच भक्तांसाठी प्रसादाचे वितरण करण्यात आले. सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “आंबा महोत्सवाच्या माध्यमातून भक्तांमध्ये श्रद्धा आणि भक्तीभाव अधिक दृढ व्हावा, हा उद्देश आहे.” कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते आणि भक्तांनी परिश्रम घेतले.





















