बार्शी – बार्शी-सोलापूर रस्त्यावर शहरालगत असलेल्या घोरओढ्या येथील रेल्वे पुलाजवळ शनिवार दि. २३ मे रोजी सायंकाळी सव्वा सातच्या दरम्यान झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातात बार्शीतील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातात युवराज विजय पवार (वय २१, रा. सोलापूर रोड, बार्शी) यांचा मृत्यू झाला. तर विवेक विश्वनाथ सातपुते (वय २१), सुदर्शन सुहास दळवी (वय २१) आणि सम्राट अरविंद पाटील (वय २२, सर्व रा. सासुरे, ता. बार्शी) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सासुरे येथील तिघेजण आपल्या एका मित्राला अचानक चक्कर येत असल्याने त्याला दुचाकीवरुन उपचारासाठी बार्शीकडे घेऊन येत होते. त्याचवेळी बार्शीकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीची रेल्वे पुलाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली.
अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर एका दुचाकीवरील तिघेजण थेट पुलाखालच्या सुमारे २५ ते ३० फूट खोल जागेत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याचबरोबर या अपघातात दुचाकीची चाके गाडीपासून वेगळी झालेली होती. या घटनेत तिघांच्या हात-पायांना गंभीर दुखापती व फ्रॅक्चर झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरच करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम बार्शी शहर पोलीस ठाण्यात सुरु होते.
Post Views: 31