टेंभुर्णी – आलेगाव बु. येथील मायनर क्रमांक ५ मधून शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी अक्षरशः जीव धोक्यात घालून ‘जलबुडी आंदोलन’ छेडत प्रशासनाला हादरवून सोडले. भिमानगर येथील हायवे पुलावरून आंदोलकांनी थेट डाव्या कालव्यात उड्या घेत सात किलोमीटर अंतर पोहत पार केले. या थरारक आंदोलनानंतर अखेर जलसंपदा विभागाला माघार घ्यावी लागली असून ३१ मेपर्यंत तांत्रिक दुरुस्ती करून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी देण्यात येईल, असे लेखी व तोंडी आश्वासन सोलापूर येथील जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिले. त्यामुळे सात जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आलेगाव खुर्द ते भांडगाव दरम्यान भिमा नदीवर तातडीने बंधारा उभारावा तसेच आलेगाव खुर्द परिसरातील शेतकऱ्यांना मायनर क्रमांक ५ मधून नियमित पाणीपुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले होते. दुपारी भिमानगर येथे सुरू झालेल्या आंदोलनाने काही वेळातच नाट्यमय वळण घेतले. आंदोलकांनी पुलावरून थेट कॅनॉलमध्ये उड्या घेत प्रशासनाला इशारा दिला.
हरिभाऊ माने, नंदकुमार गायकवाड, ओंकार गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश शिंदे, रोहित काळे, महेश गाडे, नवनाथ कळसाईत आदी आंदोलकांनी कॅनॉलमध्ये उतरून जीवाची पर्वा न करता पोहत आलेगाव बुद्रुकपर्यंतचा सात किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या धाडसी आंदोलनामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. आलेगाव बुद्रुक येथे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यांनी शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविल्याचे सांगत मायनर दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात येईल व शासन मान्यता मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या सेवेसाठी मायनर कार्यान्वित करून नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी पत्र आंदोलकांना सुपूर्द केले.
या आंदोलनामुळे प्रशासन सतर्क झाले होते. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आरोग्य विभागाची पथके, आपत्कालीन यंत्रणा व अधिकारी वर्ग सज्ज ठेवण्यात आला होता. उपकार्यकारी अभियंता इंगळे, शाखा अभियंता भोयर, शाखा अभियंता पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र पाटील, सुभाष गायकवाड, दिनकर गायकवाड, दादा कळसाईत, गणेश देवकते, ज्ञानेश्वर देवकते, अशोक कळसाईत, शहाजी निकम, कालिदास गायकवाड, गणेश कवडे, निलेश पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी व आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आंदोलनकर्ते हरिभाऊ माने यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की,
“शासनाने यानंतरही दखल घेतली नाही अथवा अंमलबजावणी केली नाही, तर मंत्रालयात जलसंपदा मंत्र्यांच्या कार्यालयासमोर उजनी प्रकल्पग्रस्तांचा आक्रोश जागर आंदोलन छेडण्यात येईल.”
या धाडसी आंदोलनामुळे उजनी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता प्रशासन दिलेले आश्वासन कितपत पूर्ण करते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Post Views: 7