बार्शी – परांडा रोडवरील प्रविण हॉटेलजवळ भरदिवसा पत्नीचा निर्घृण खून करुन फरार झालेल्या आरोपी पतीस बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ अटक करुन गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार हत्यार जप्त केले आहे. या प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगळवार दि. २६ मे रोजी बार्शी तालुका ग्रामीण पोलिसांनी आरोपीस न्यायालयासमोर हजर केले. पुढील तपासासाठी पोलिसांनी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती एच. यू. यू. पाटील यांनी आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि. २५ मे रोजी सकाळी सुमारे १०:१५ वाजण्याच्या सुमारास विवाहित महिला धनश्री ऋषीकेश पाटील या बचतगटाचे काम करुन लक्ष्याचीवाडी गावाकडून बार्शीकडे ज्युपिटर दुचाकी (क्र. MH 13 FA 4016) वरुन परत येत होत्या. त्या बार्शी-परांडा रोडवरील प्रविण हॉटेलजवळ आल्या असता आरोपी पती ऋषीकेश संभाजी पाटील (रा. नागणे प्लॉट, परांडा रोड, बार्शी) याने त्यांना अडवून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत धारदार हत्याराने गळा, मान व पोटावर सपासप वार केले.
घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक महेश माने व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी धनश्री पाटील यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
या प्रकरणी फिर्यादी जितेंद्र विश्वनाथ गायकवाड (वय ५६, रा. कासारवाडी, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ दोन विशेष पथके तयार करुन रवाना केली होती. तपासादरम्यान आरोपीस ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्यात वापरलेले धारदार हत्यार एका ठिकाणी लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत फिंगरप्रिंट पथक, डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतीने तपास करुन संबंधित हत्यार जप्त केले.या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश माने हे करीत आहेत.
Post Views: 11