बार्शी – शहरातील एका परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुलीची आई यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या घरकाम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना तीन मुली असून मोठी मुलगी ही बार्शी शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत आहे.
सोमवार दि. २५ मे रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास मुलीने “कॉलेजचा फॉर्म भरुन येते” असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र उशिरापर्यंत ती घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिच्या कॉलेजमध्ये, मैत्रिणींकडे, नातेवाईकांकडे तसेच परिसरात शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही.
यामुळे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून किंवा आमिष दाखवून तिला पळवून नेल्याची खात्री झाल्याने मुलीच्या आईने बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बेपत्ता मुलीने घरातून जाताना काळ्या-पांढऱ्या रंगाची कुर्ती, पांढऱ्या रंगाची लेगिंग, कानात सोन्याच्या रिंगा, नाकात सोन्याचे फूल, गळ्यात चांदीची चैन व पायात चॉकलेटी रंगाचे सँडल परिधान केले होते. ती हिंदी व मराठी भाषा स्पष्ट बोलते. तिच्यासोबत अंदाजे ४५ हजार रुपयांची रोकडही असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरु असून, अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
Post Views: 7