सोलापूर – शासकीय कार्यालयांच्या उंबरठ्यावर वारंवार फेऱ्या मारूनही कामे रखडत असल्याच्या तक्रारी नेहमीच पुढे येतात. मात्र आता नागरिकांच्या अडचणी थेट जिल्हा परिषदेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी नागरिकांसाठी विशेष व्हॉट्सअॅप हेल्पलाइन सुरू करत तक्रार निवारणाची नवी व्यवस्था कार्यान्वित केली आहे.
नागरिकांना शासकीय कार्यालयांत वारंवार ये-जा करावी लागू नये, त्यांचा वेळ व पैसा वाचावा आणि तक्रारींवर तत्काळ कार्यवाही व्हावी, या उद्देशाने हा पुढाकार घेण्यात आला आहे. नागरिकांना त्यांच्या अडचणी, अर्ज किंवा तक्रारी पुराव्यासह थेट अधिकृत मोबाइल क्रमांकावर पाठविता येणार आहेत. प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची संबंधित विभागामार्फत चौकशी करून त्याची माहिती तक्रारदाराला दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, सीईओ कुशल जैन यांनी नागरिकांसाठी दर सोमवार व शुक्रवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ राखून ठेवला आहे. मात्र शासकीय दौरे किंवा तातडीच्या बैठका असल्यास नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून व्हॉट्सअॅपद्वारे संवादाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाल्यानंतर नागरिकांच्या कामांसाठी कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. अशा वेळी तक्रार निवारणाची डिजिटल व्यवस्था सुरू झाल्याने नागरिकांना थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे पारदर्शकता वाढण्याबरोबरच कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांनी या सुविधेचा जबाबदारीने वापर करून आपले प्रश्न, तक्रारी आणि अडचणी पुराव्यासह व्हॉट्सअॅपवर पाठवाव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोट
अनेकदा दौरे आणि बैठकींमुळे प्रत्येक नागरिकाला प्रत्यक्ष भेटणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकांच्या फेऱ्या वाया जाऊ नयेत, यासाठी हा पर्याय सुरू केला आहे. नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल,” असे सीईओ कुशल जैन यांनी सांगितले.
Post Views: 25