सोलापूर – जिल्हा परिषद प्रशासनातील शिस्त, स्वच्छता आणि कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी बुधवारी विविध विभागांना अचानक भेट देत धडक तपासणी केली. या पाहणीत अनेक विभागांतील अनियमितता, अस्वच्छता आणि कर्मचारी गैरहजेरी उघड झाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जागेवर अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने नोटिसा बजावण्याचे आदेश संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आले.
पाहणीची सुरुवात रेकॉर्ड विभागापासून करण्यात आली. या विभागात दप्तर, फायली, टेबल-खुर्च्या तसेच कपाटे अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली दिसून आली. विभागातील रेकॉर्ड व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी संताप व्यक्त केला. “या विभागाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे?” अशी विचारणा त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे केली. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना समाधानकारक माहिती देता आली नाही. अध्यक्ष व उपाध्यक्षांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात कर्मचारी अपयशी ठरल्याने संबंधित विभाग प्रमुखांना तातडीने बोलावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
त्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्षांनी प्राथमिक शिक्षण विभागाची पाहणी केली. या विभागात सर्वत्र अस्वच्छता, सांडलेले पाणी आणि रिकाम्या खुर्च्या आढळून आल्या. अनेक कर्मचारी आपल्या टेबलवर अनुपस्थित असल्याचे दिसून आले. याबाबत शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता “काही कर्मचारी बाहेर गेले आहेत, काही जेवायला गेले आहेत,” असे उत्तर देण्यात आले. तसेच काही कर्मचारी रजेवर असल्याचेही सांगण्यात आले. मात्र त्यांच्या रजेची कोणतीही अधिकृत नोंद अथवा पुरावा तत्काळ उपलब्ध करून देता आला नाही.
या प्रकारामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी नाराजी व्यक्त करत संबंधित गैरहजर कर्मचाऱ्यांना तातडीने नोटिसा काढण्याचे आदेश शिक्षणाधिकारी शेख यांना दिले. “कार्यालयीन वेळेत कर्मचारी अनुपस्थित राहणे आणि त्याची योग्य नोंद नसणे गंभीर बाब आहे. जिल्हा परिषद कार्यालयात शिस्त आणि जबाबदारी आवश्यक आहे,” असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यानंतर माध्यमिक शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागाच्या कार्यालयाचीही झाडाझडती घेण्यात आली. विविध विभागांतील कामकाज, उपस्थिती नोंदी, स्वच्छता आणि प्रशासनिक शिस्त यांची सखोल पाहणी करण्यात आली. अचानक झालेल्या या तपासणीमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
चौकट
अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी पुढील काळातही अशाच प्रकारच्या अचानक पाहण्या सुरू राहणार असल्याचे संकेत दिले. नागरिकांना वेळेत आणि पारदर्शक सेवा मिळावी, यासाठी प्रशासनातील शिस्तभंग सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.