सोलापूर : शैक्षणिक साहित्य १० ते २० टक्क्यांनी महागल्याने पालकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून वही, पुस्तके, दप्तर, गणवेश आणि इतर शालेय साहित्याच्या वाढत्या किमतींमुळे शिक्षणाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या पालकांना आता मुलांचे शिक्षण परवडणे कठीण होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. “सांगा, मुलांना कसं शिकवायचं?” असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात असून, शिक्षणावरील वाढता आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
नवे शैक्षणिक वर्ष अवघ्या काही दिवसांवर आले असतानाच यंदा पालकांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. वाढत्या महागाईमुळे बाजारपेठेत वह्या, पुस्तके, शालेय गणवेश , शूज आणि स्कूल बॅग अशा सर्वच शैक्षणिक साहित्यांच्या दरात तब्बल १० ते २० टक्क्यांची भरमसाठ वाढ झाली आहे. यामुळे पालकांना मोठा खर्च सहन करावा लागणार आहे.
कच्चा माल, कागद आणि कापसाचे दर वाढल्यामुळे उत्पादकांनी किमती वाढवल्याचे स्टेशनरी चालकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एका मुलाच्या शालेय साहित्याचे बजेट दुप्पट झाले आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय पालकांचे पगार स्थिर असताना, शैक्षणिक खर्चात झालेली ही मोठी वाढ त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे करणारी ठरत आहे. शाळांची फी, त्यातच आता साहित्याची दरवाढ यामुळे सोलापूरच्या बाजारपेठेत अद्याप म्हणावी तशी खरेदीसाठी गर्दी दिसून येत नाही. मात्र, पुढच्या आठवड्यात बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यता दुकान चालकांकडून व्यक्त करण्यात आली आहे. साहित्याच्या या दरवाढीबद्दल पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
किंमत व वह्यांचे प्रकार
यंदा वह्यांच्या दरात मोठी वाढ झाली असून, बाजारपेठेतील प्रमुख प्रकार आणि त्यांचे प्रति डझन असे आहेत.
रेगुलर वही : ३६०, लॉंग बुक : ५४०, जंबो साईज : ५८० ते ६००, ए4 लॉंग बुक : ६४०.
स्कूल बॅगच्या दरात २० टक्के वाढ
कापड आणि मॅन्युफॅक्चरिंग खर्च वाढल्यामुळे यंदा स्कूल बॅग २० टक्क्यांनी महागल्या आहेत. सध्या बाजारात गुणवत्तेनुसार ३०० पासून ६०० आणि त्यापुढील किमतीत बॅग्ज उपलब्ध आहेत. अशी माहिती बॅग दुकान मॅनेजर महेश शिंदे यांनी सांगितले
.
कागद आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे वह्या व स्टेशनरीच्या किमतीत थोडीफार वाढ झाली आहे. पालकांवर अचानक आर्थिक भार पडू नये, यासाठी आम्हीही आमच्या नफ्याचे प्रमाण कमी ठेवून माल विकत आहोत, असे स्टेशनरी चालक विश्वजीत जेधे यांनी स्पष्ट केले.
पगार वाढला नाही पण खर्च वाढला
पगार वाढला नाही, पण फीसह वह्या, गणवेश, बॅगचे दर २० टक्क्यांनी वाढलेत. एकाच वेळी एवढा खर्च कसा करायचा? महागाईमुळे मुलांना शाळेत घालावं की नको, अशी भीती वाटू लागली आहे, अशी माहिती केरबा माने या पालकांनी दिली.
Post Views: 18