सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ग्रामीण भागात ६ तासांऐवजी ८ तास थ्री फेज वीजपुरवठा कायम ठेवण्यात यावा, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सध्या महावितरणकडून केवळ ६ तास थ्री फेज वीजपुरवठा केला जात असल्याने शेतकरी व पशुपालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. दूध व्यवसायासाठी जनावरांच्या दुधाची धार काढणारी यंत्रणा, पाणीपुरवठ्यासाठी मोटारी तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी लागणारी कडबाकुट्टी मशीन चालविण्यासाठी अखंडित वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन शेती आणि पशुपालन व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचेही खासदार शिंदे यांनी म्हटले आहे.
ग्रामीण भागातील सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ६ तासांऐवजी ८ तास थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवण्याबाबत संबंधित विभागाला तातडीने निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
Post Views: 10