बार्शी – व्यवसायासाठी बँक तसेच प्रायव्हेट फंडिंगद्वारे कर्ज मंजूर करुन देण्याचे आमिष दाखवत जवळपास चार लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात पुणे येथील एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अल्ताफ अख्तर मोमीन (वय ३५, रा. बालाजी कॉलनी, सोलापूर रोड, बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत कमलाकर बडेकर (वय ४९, रा. आंबेगाव बुद्रुक, स्वामी समर्थ मठाजवळ, आंबेगाव पठार, पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ फेब्रुवारी २०२४ ते ९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत बार्शी येथील एका कलेक्शन सेंटरमध्ये तसेच ऑनलाईन माध्यमातून संबंधित आरोपीने फिर्यादी यांना व्यवसायासाठी बँक व खासगी वित्तीय संस्थांमार्फत कर्ज मंजूर करुन देण्याचे आश्वासन दिले. या प्रक्रियेसाठी विविध कारणे सांगून आरोपीने फिर्यादीकडून ऑनलाईन व रोख स्वरुपात एकूण ३ लाख ९८ हजार ६५० रुपये स्वीकारल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, संबंधित कर्ज मंजूर करून देण्यात आले नाही. तसेच वेळोवेळी पैशांची मागणी करुनही आरोपीने घेतलेली रक्कम परत न केल्याने फिर्यादीची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादी यांनी यापूर्वी स्थानिक अर्ज क्रमांक ६६२/२०२५ दाखल केला होता. त्यावरील चौकशी अहवाल, तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर गुन्हा दाखल करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सोनमाळी करीत आहेत.
Post Views: 10