सोलापूर – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, सोलापूर शाखेच्या वतीने मोदीखाना येथे उभारण्यात येत असलेल्या हक्काच्या सांस्कृतिक वास्तूचे (सभागृहाचे) अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी ३२ लाख १ हजार ९७३ रुपयांचा निधी आपल्या खासदार निधीतून उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही विनंती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार आणि पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत, नाट्य परिषदेने जेवढा निधी मागितला आहे, तेवढा निधी राज्याचे मराठी भाषा विकास मंत्री उदय सामंत यांच्याकडून मिळवून देण्यासाठी विशेष पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी दिले.
सोलापूर शहरात संपन्न झालेले ऐतिहासिक ८८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीमुळे आणि भव्य आयोजनामुळे ‘न भूतो न भविष्यती’ असे ठरले होते. या संमेलनाच्या उर्वरित निधीतून आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सहकार्याने मोदीखाना येथे परिषदेची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे. मात्र, निधीअभावी या इमारतीचे काम अद्याप अपूर्ण आहे.
प्रस्तुत आराखड्यानुसार नाट्य परिषदेच्या स्वर्गीय पद्माकर देव या इमारतीमधील खालील महत्त्वपूर्ण कामे निधीअभावी प्रलंबित आहेत वरील मजल्यावरील मुख्य सभागृहाचे बांधकाम. कलावंतांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आवश्यक असणारे फर्निचर. हे काम पूर्ण झाल्यास सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील कलावंत आणि तंत्रज्ञांसाठी एक सुसज्ज, हक्काची आणि प्रेरणादायी वास्तू निर्माण होईल, असा विश्वास नाट्य परिषदेने व्यक्त केला आहे. नाट्य परिषदेच्या सोलापूर शाखेने आजवर अनेक रचनात्मक उपक्रम राबवले आहेत. सलग १२ वर्षे ‘सुशील करंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून संस्थेने नाट्य चळवळीला नवे बळ दिले आहे. तसेच, गेली २० वर्षे सातत्याने नाट्य कार्यशाळा घेऊन नवोदित कलावंतांना घडवण्याचे कार्य संस्था करत आहे. हे सांस्कृतिक वैभव अधिक समृद्ध करण्यासाठी आता उर्वरित ३२ लाख रुपयांच्या निधीची तातडीने गरज आहे.
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी या मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन सोलापूरच्या कलावंतांचे स्वप्न साकार करावे, अशी अपेक्षा या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, उपाध्यक्ष विठ्ठल बडगंची, अशोक किल्लेदार, प्रमुख कार्यवाह प्रा. ज्योतिबा काटे, नियामक मंडळाचे सदस्य सुमित फुलमामडी पद्माकर कुलकर्णी, राजू रंगम, प्रशांत देशपांडे, राजाराजेशचंद्र, दत्तात्रय बडगंची यांच्यासह नाट्य परिषदेचे इतर मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 10